कन्नड (औरंगाबाद) - राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. मान्सूनच्या आगमानामुळे खरिप हंगामाच्या पेरणीलाही आता शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये मृग नक्षत्राला मोठे महत्व आहे. बुधवारी सांयकाळी कन्नडमध्ये मृग नक्षत्राच्या गुरुवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी सायंकाळी सरी बरसल्या. या पावसामुळे शेतकऱ्यांनी कापूस, मका, आल्याच्या लागवडीला सुरुवात केली आहे.
या पावसामुळे तालुक्यातील काही भागात मूग, उडीद, कापूस, मका, आलं लागवडीसाठी शेतकरी सरसावला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी होते, त्या शेतकऱ्यांनी आल्याची लागवड अगोदरच केली आहे. कन्नड तालुक्यातील 6 महसूल मंडळात खरीप पूर्व काळात 108 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीला सुरुवात केली आहे.
कन्नड तालुक्यात खरीपासाठी 94 हजार 86 हेक्टर क्षेत्र निर्धारीत आहे. यापैकी कापूस निर्धारीत 51 हजार 565 पैकी 41 हजार हेक्टर, मकासाठी 25 हजार 814 हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे, तर आलं लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या या तालुक्यात यंदा सुमारे दीड हजार हेक्टर वाढ अपेक्षित आहे. कृषी विभागाकडून सुमारे 35 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्यास लागवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, तालुक्यात खरीपातील मृग नक्षत्रात 15 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. ओलीताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी करण्यास हरकत नाही. परंतू, कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता पुरेसा पाऊस झाल्यानंतर खरीप पिकांची पेरणी करावी, असे तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांनी सांगितले.