लंडन - इंग्लंडचा सलामीचा आक्रमक फलंदाज जॉनी बेअरस्टो विश्वकरंडाकापूर्वीच तुफान फॉर्मात आहे. मंगळवारी पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने पुन्हा शतक झळकावले. जॉनी बेअरस्टोने २०११ साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो अद्याप एकदाही एकदिवसीय विश्वकरंडकात खेळलेला नाही. विश्वकरंडकात खेळण्याचे त्याचे स्वप्न आता मायदेशातच ८ वर्षानंतर पूर्ण होणार आहे.
जॉनी बेअरस्टोला सुरुवातीला क्रिकेटमध्ये छाप सोडता आली नाही. त्यामुळे तो काही काळ संघाबाहेरही राहिला. त्यानंतर आपल्या फलंदाजीत सुधारणा करून त्याने आपले स्थान संघात पक्के केले. जगातील आक्रमक फलंदाजाच्या यादीत आज त्याचे नाव घेतले जात आहे. त्याने आतापर्यंतच्या ६१ सामन्यात २ हजार २९७ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ७ शतके आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यात विंडीज विरुद्धची नाबाद १४१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
जॉनी बेअरस्टोची सरासरी सचिन तेंडुलकरपेक्षाही चांगली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनचची सरासरी ४४.८३ अशी होती. इंग्लंडकडून सर्वाधिक एकदिवसीय शतके ठोकण्यात तो आठव्या स्थानावर आहे. टी-२० क्रिकेटमध्येही त्याचा धमाका सुरू आहे. भारतात झालेल्या आयपीएलमध्येही त्याने दमदार फलंदाजी करत छाप सोडली होती.