जळगाव- पीककर्ज वाटपात जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेेने आघाडी घेतली आहे. राज्यात सर्वाधिक 1 लाख 25 हजार शेतकऱ्यांना 410 काेटी रुपयांचे कर्ज वितरण करणारी जळगाव जिल्हा बँक ही राज्यात अव्वल ठरली आहे. जळगाव पाठाेपाठ पुणे मध्यवर्ती बँकेने सर्वाधिक शेतकऱ्यांना कर्जवाटप केले आहे.
शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. उपलब्ध निधीमध्ये शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी जळगाव जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना 50 टक्के कर्ज वाटप केले जात आहे. याेजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये आतापर्यंत 1 लाख 25 हजार शेतकाऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना बँकेने एकूण 410 काेटी रुपयांचे कर्ज दिले आहे.
पुणे मध्यवर्ती बँकेने 80 हजार शेतकऱ्यांना कर्जवाटप केले आहे. राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांनी एकूण 3 लाख शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले आहे. त्यात एकट्या जळगाव जिल्ह्याचा वाटा हा सव्वा लाख शेतकरी एवढा आहे.
राष्ट्रीयकृत बँका शासनाला जुमाने ना:
कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका तयार नाहीत. शासनाचे आदेश असले तरी या बँकांचे नियंत्रण शासनाकडे नसल्याने आदेश पाळले जात नाहीत. अशा स्थितीत शेतकरी मध्यवर्ती बँकांवर अवलंबून आहेत.
प्रमाणीकरणाला प्रारंभ:
कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांचे बँकेत प्रमाणीकरण करून त्यांना लाभ दिला जात आहे. जिल्हा बँकेकडील कर्ज असलेल्या 1 लाख 40 हजार 575 शेतकऱ्यांपैकी 1 लाख 14 हजार शेतकऱ्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पीककर्जाचा लाभ दिला हाेता. नव्या यादीतील शेतकऱ्यांच्या प्रमाणीकरणाचे काम बँकेकडून अद्यापही सुरू आहे.