रत्नागिरी - सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जनतेने सावधानता बाळगावी असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले.
शनिवारी अवकाळी पावसाने सर्व जिल्हाभरात हजेरी लावली होती. संगमेश्वरमधील धामणी परिसरात तर गारांचा पाऊस पडला होता. काही भागात मुसळधार पाऊस पडल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. रत्नागिरी शहरातील कुवारबाव, साळवी स्टॉप येथे जोरदार पाऊस पडला.
अवकाळी पावसाने जिल्ह्यातील आमराईचे बऱयाच प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात परत आज पावसाची शक्यता असल्याने आंबा बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत. लोकांनी सुरक्षित राहण्यासाठी सावधान असावे, असे प्रशासनाने सांगितले आहे.