लंडन - एक महिला 2015 साली किशोरवयात असताना इस्लामीक स्टेट ऑफ इराक अॅन्ड सिरिया(आयसीस) संघटनेत सामील होण्यासाठी इंग्लडमधून सिरियाला पळून गेली होती. या घटनेनंतर इंग्लडने तिचे नागरिकत्व रद्द केले होते. मात्र, नागरिकत्वाची हक्काची लढाई लढण्यासाठी इंग्लडमध्ये परतण्यास तिला न्यायालयाने परवानगी दिली आहे.
इंग्लडने देशाच्या सुरक्षेचे कारण पुढे करत या महिलेचे नागरिकत्व रद्द केले होते. नव्याने नागरिकत्व देण्यासही प्रशासन तयार नाही. शमिया बेगम असे या महिलेचे नाव आहे. 2015 साली शाळेत असताना तीन मुली आयसीसमध्ये सहभागी होण्यासाठी सिरीयाला गेल्या होत्या. मात्र, नंतर शमिया सिरीयातील एका निवारागृहात दिसून आली. तिने पुन्हा इंग्लडमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला नागरिकत्व नाकारण्यात आले.
तत्कालीन परराष्ट्र सचिव साजिद जावेद यांनी शमियाचे नागरिकत्व रद्द केले होते. शमिया मुळची बांग्लादेशची असून ती तेथे जाऊ शकते, असा युक्तीवाद जावेद यांनी केला होता. मात्र, आता नागरिकत्वाच्या हक्काची लढाई लढण्यास शमिया तयार झाली आहे. इंग्लड सरकारच्या निर्णयाला तिने आव्हान दिले आहे. माझ्याकडे कोणत्याही दुसऱ्या देशाचे नागरिकत्व नसल्याने मी दुसरीकडे जाऊ शकत नाही, असे ती म्हणाली.