जयपूर - आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयलचा सामना मुंबई इंडियन्स संघासोबत होणार आहे. हा सामना दुपारी ४ वाजता सवाई मानसिंह स्टेडियमवर होणार आहे. राजस्थान ८ सामन्यात ४ गुण मिळवत गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. मागच्या सामन्यात पंजाबने राजस्थानचा १२ धावांनी पराभव केला होता.
यंदाच्या आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणे आणि स्टीव स्मिथ यांची बॅट अजूनही शांतच आहे. तर संजू सॅमसनला हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात शतक ठोकल्यानंतर पुन्हा छाप सोडता आली नाही. स्मिथ मागील सामन्यात खेळला नाही. या सामन्यात रहाणे ऑस्ट्रेलियाच्या अॅश्टन टर्नर याला संधी देऊ शकतो. इंग्लंडचा जोफ्रा आर्चर या संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याकडून आजच्या सामन्यात राजस्थानला खूप अपेक्षा आहेत.
दुसरीकडे ३ वेळा आयपीएलचा किताब जिंकणारा मुंबईचा संघ चांगल्या फॉर्मात आहे. मागील सामन्यात त्यांनी दिल्लीला ४० धावांनी धूळ चारली होती. मागच्या सामन्यात मुंबईच्या एकाही फलंदाजाने अर्धशतक ठोकले नसले तरी राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर त्यांना सामना जिंकण्यात यश आले. कृणाल आणि हार्दिक यांच्याकडून मुंबईच्या संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
मुंबईला या सामन्यात विजयाचा दावेदार मानला जात असले तरी दोन्ही संघात यापूर्वी झालेल्या सामन्यात राजस्थानने मुंबईचा ४ गडी राखून पराभव केला होता.