मुंबई - आयपीएलमध्ये आज दुसरा क्वॉलिफायर सामना चेन्नई आणि दिल्ली यांच्यात रंगणार आहे. चेन्नईची नजर आठव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारण्यावर असेल. तर दुसरीकडे अनेक वर्षाच्या कालावधीनंतर सौरव गांगुली आणि रिकी पाँटिग यांच्या मार्गदर्शनानंतर दिल्लीने दमदार कामगिरी करत क्वॉलिफायच्या सामन्यापर्यंत मजल मारली आहे.
या सामन्यात चेन्नई आणि दिल्लीमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. दिल्ली संघातील युवा जोश आणि चेन्नई संघातील अनुभवी खेळाडू, असा सामना येथे पाहायला मिळेल.
चेन्नईने मुंबईविरुद्धच्या सामन्यापासून धडा घेतला असेल. दोन्ही संघात एकूण २० सामने झाले आहेत. ज्यापैकी चेन्नईला १४ तर दिल्लीला ६ सामन्यांत यश मिळाले. आजचा सामना जो संघ जिंकेल तो १२ मे रोजी मुंबईविरुद्ध अंतिम सामन्यात भिडेल.
दिल्लीच्या संघातील शिखर धवन, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत हे तुफान फॉर्मात आहेत. ते कोणत्याही क्षणी सामन्याचा फासा पलटवू शकतात. कर्णधार श्रेयस अय्यरने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. कंगिसो रबाडाची कमतरता इतर गोलंदाजांनी भरून काढली. चांगल्या भागीदारीनंतर विकेट देऊन परतणे ही दिल्लीच्या संघाची कमजोरी आहे. त्यावर काम करणे गरजेचे आहे. अमित मिश्रा सोडले तर इतर कोणताही अनुभवी फिरकी गोलंदाज संघात नाही.
दुसरीकडे चेन्नई संघात सर्व विदेशी खेळाडू उपलब्ध आहेत. इम्रान ताहिर, हरभजन सिंग आणि रवींद्र जाडेजा हे आपल्या जादुई फिरकी गोलंदाजीने सामन्याचा नूर पलटवू शकतात. हा संघ कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून नाही. चेन्नईच्या संघात अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. आठव्या आणि नवव्या क्रमाकांचे खेळाडूसुद्धा फलंदाजी करू शकतात. शेन वॉटसन सतत फेल ठरत आहे. चेन्नई संघातील मध्यक्रमात सुरेश रैना आणि महेंद्र सिंह धोनीला सोडून कोणताच अनुभवी फलंदाज नाही.