पुणे - दिवसेंदिवस पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशात कोरोनाच्या संसर्गाविरोधात लढण्यासाठी मध्य रेल्वेच्या माध्यमातून रोबोटिक कॅप्टन अर्जुनचे संशोधन करण्यात आले आहे. पुण्यात रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या माध्यमातून रोबोटीक कॅप्टनचे शुक्रवारी उदघाटन करण्यात आले. या माध्यमातून प्रवाशांचे तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांचे स्क्रीनिंग आणि रेल्वे स्टेशन परिसरात लक्ष ठेवण्याचे काम केले जाणार आहे.
या रोबोटिक कॅप्टनमुळे रेल्वे स्टेशनवर स्क्रिनिंगचे काम अधिक वेगाने आणि काटेकोर पणे केले जाण्यास मदत होईल. सोबतच अवैध बाबींवर लक्ष ठेवण्यासही मदत होणार आहे. रेल्वे बोर्डाचे महासंचालक, मध्य रेल्वेचे महा व्यवस्थापक, पुणे विभागाच्या व्यवस्थापक यांच्या उपस्थित या रोबोटीक अर्जुनचे उदघाटन करण्यात आले. प्रवाशांचे तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांचे कोरोनाच्या संसर्गाच्या धोक्यापासून रोबोटीक अर्जुन संरक्षण करेल आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही याची चांगली मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
रोबोटिक अर्जुन मध्ये मोशन सेन्सर, फिरता कॅमेरा, डोम कॅमेरा या इंटेलिजन्स यंत्रणेचा वापर करण्यात आला आह. यात सायरन तसेच मोशन अॅक्टिव्हेटेड स्पॉट लाईट ची यंत्रणा आहे. तसेच इंटरनेटशी जोडण्यात आलेली यंत्रणा असून इंटरनेट बंद झाल्यास रेकॉर्डिंग करून ठेवण्यासाठी इंटरर्नल स्टोरेजची व्यवस्थाही यामध्ये करण्यात आली आहे. कॅप्टन अर्जुन हा अत्यंत कमी वेळात स्क्रिनिंग करतो. जास्त तापमान आढळल्यास अलार्म वाजण्याची व्यवस्था यात आहे. हा रोबो टू वे कम्युनिकेशन व्यवस्था असून स्थानिक भाषेत संवाद साधण्याची कला या रोबोकडे आहे. तसेच सेन्सरवर आधारित सॅनिटायझर आणि मास्क डिस्पेन्सर यात आहे. हा रोबो फिरू शकतो. या रोबोमुळे एक चांगली यंत्रणा रेल्वे परिसरात उपलब्ध झाली आहे.