मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या दोन महिन्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाखांवर गेला आहे. गेल्या २० दिवसात मुंबईत १ लाख ३८ हजार २४६ रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच कालावधीत तब्बल ९८ हजार ६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
20 दिवसात 98 हजार रुग्णांना डिस्चार्ज
मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरू आहे. हा प्रसार जानेवारी-फेब्रुवारी 2021दरम्यान कमी झाला होता. मात्र लॉकडाऊनमध्ये शिथिलथा दिल्यावर, लोकल ट्रेनसह सर्व व्यवहार सुरू झाल्यावर फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसात ८ ते ११ हजार रुग्ण दिवसाला आढळून येत आहेत. मुंबईत २१ मार्चला ३ लाख ६२ हजार ६५४ रुग्णांची नोंद झाली होती. ९ एप्रिलला ५ लाख ८९८ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २० दिवसात मुंबईत १ लाख ३८ हजार २४६ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत मार्च महिन्यात दिवसाला ५०० ते ६०० रुग्ण बरे होऊन घरी जात होते. २१ मार्चला २ लाख ९९ हजार ५४६ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. ९ एप्रिलपर्यंत ३ लाख ९७ हजार ६१३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्या २० दिवसात ९८ हजार ६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
90 हजार 333 सक्रिय रुग्ण
मुंबईत काल कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 898वर पोहोचला आहे. मृतांचा आकडा 11 हजार 909वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 97 हजार 713 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 90 हजार 333 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 34 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 76 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 777 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोनारुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 45 लाख 09 हजार 881 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग हॉटस्पॉट
मुंबईत अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे, घाटकोपर, मालाड, मुलुंड, चेंबूर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे. २ पेक्षा अधिक रुग्ण आढळून येणारे मजले सील केले जात आहेत. तर ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळून येणाऱ्या इमारती सील केल्या जात आहेत. ज्या इमारतींमध्ये कोरोना रुग्ण आहेत, त्या इमारतीमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश बंद असणार आहे. कोरोना नियमांचे पालन ज्या सोसायट्या करणार नाहीत त्यांच्याकडून १० हजार ते २० हजार दंड वसूल केला जाणार आहे.
खाटा खाली करण्यासाठी डिस्चार्ज
मुंबईमध्ये कोरोनारुग्ण वाढत आहेत. रुग्ण वाढत असल्याने खाटांची संख्या कमी आहे. रुग्णांना खाटा उपलब्ध करता याव्यात म्हणून जे रुग्ण घरी उपचार घेऊ शकतात त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. तसेच अनेक रुग्णांना ते बरे झाल्याने घरी पाठवण्यात आले आहे. यामुळे घरी पाठवण्यात आलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.