मुंबई - मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपरकिंगमध्ये झालेल्या प्ले ऑफच्या पहिल्या सामन्यात मुंबईने चेन्नईवर सहा गडी राखून विजय मिळविला. या विजयासह मुंबईने अंतिम फेरी गाठली. हा सामना मुंबईने जरी जिंकला असला तरी या सामन्यात चेन्नईचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहीर यानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ३०० बळी घेण्याचा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील सातवा गोलंदाज ठरला आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये भल्या-भल्या फलंदाजांची भंबेरी उडविणाऱ्या ताहिरने कालच्या सामन्यात इशान किशन आणि कृणाल पंड्या यांना बाद केले. यातील कृणाल पंड्या ताहिरचा ३०० बळी ठरला. या सामन्यात त्याने ३३ धावा देत २ गडी बाद केले. ३०० बळी घेणारा तो चौथा फिरकीपटू ठरला आहे. या यादीत ३०० पेक्षा जास्त बळी घेणारे केवळ ३ वेगवान गोलंदाज आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्यात ड्वेन ब्राव्हो आघाडीवर आहे. त्याने ४८८ बळी घेतले आहे. लसिथ मलिंगा ३७७, सुनील नरेन ३७० , शाकिब अल हसन ३४६, शाहिद आफ्रीदी ३३३ , सोहेल तन्विर ३२६ बळी घेतले आहेत. ताहिरला आफ्रिकेच्या विश्वचषकाच्या संघात स्थान देण्यात आले आहे. तो विश्वचषकानंतर निवृत्त होणार आहे.