उस्मानाबाद - बोगस सोयाबीन बियाणे विक्रीच्या तक्रारी वाढत असतानाच जिल्ह्यातील दोन दुकानांवर मान्यता प्राप्त नसलेले बियाणे विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात श्रीनिवास कृषी सेवा केंद्र आणि कृष्णाई शेती विकास केंद्र या दोन्ही दुकानात सलासार कृषी अग्रो, पिपलीया मंडी, मल्हार गड मंदसौर मध्यप्रदेश येथील कंपनीचे सोयाबीन जे.एस. 335 हे बियाणे विक्री केली जात होती. या दोन्ही दुकानांचा पंचनामा करतेवेळी श्रीनिवास कृषी सेवा केंद्रमध्ये जवळपास 92 हजार 200 रुपयांचे मान्यता प्राप्त नसलेले बियाणे आढळून आले. तर, कृष्णाई शेती विकास केंद्र या दुकानात 1 लाख 72 हजार 250 रुपयांचे मान्यता प्राप्त नसलेले बियाणे आढळले. त्यामुळे वरील दुकानदार नेहा भोईटे व विजय सावंत आणि बोगस बियाणे पुरवठादार यांच्या विरुद्ध कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक बापू राऊत यांच्या फिर्यादीवरुन आनंद नगर पोलीस ठाण्यात 420 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.