पणजी - पावसाचे नेहमीपेक्षा दोन आठवडे उशिरा आगमन झाले. तरीही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सध्या गोव्यात संततधार कायम असून सकाळपासूनच राजधानी पणजीत ११ मिलीमीटर तर, दक्षिण गोव्यातील मडगावमध्ये १७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
गोवा वेधशाळेच्या अंदाजानुसार गेले २ दिवस गोव्याच्या काही भागात संततधार कायम आहे. तसेच वाऱ्याचा वेगही जाणवत आहे. शनिवारी (२९ जुलै) ११० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. उत्तर गोव्यातील पणजी शहरात ११.२ मिलीमीटर तर दक्षिण गोव्यातील मडगावमध्ये १७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
गतवर्षीच्या पावसाची तुलना करता १ जून पासून आतापर्यंत ६९९.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जी मागील वर्षी याच दिवशी ८५७.३ मिलीमीटर एवढी नोंदवली गेली होती.
वेधशाळेने मच्छीमारांसाठी जारी केलेली सूचना कायम आहे. पुढील काही काळ समुद्र खवळलेला असेल. तसेच किनाऱ्यापासून ७५ किलोमीटर अंतरावर ताशी ४५ ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत.