सातारा - जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित सातारा तालुक्यात आढळल्याने हा तालुका 'हाॅटस्पाॅट' ठरला आहे. वाढत्या संख्येला अटकाव करण्यासाठी बाहेर फिरणाऱ्यांची आता कोरोना चाचणी करण्याची जबाबदारी पालिका आणि पंचायत समितीवर साेपविण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरू झाली.
सर्व चाचण्या निगेटिव्ह -
रॅपिड अँटिजेन चाचणी करणारी व्हॅन सातारा शहरात फिरू लागल्याने विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पहिल्या दिवशी सात जणांची चाचणी करण्यात आली. मात्र, कोणाचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली नाही. सातारा तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तहसीलदार आशा हाेळकर यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. हा आदेश प्राप्त होताच पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी तत्काळ वाहन उपलब्ध करून एक डॉक्टर एक तंत्रज्ञ, एक पोलीस व एक नर्स असे पथक रवाना केले .
सातारा तालुक्यात 281 प्रतिबंधित क्षेत्रे -
गेल्या काही दिवसांपासून विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्तीची कारवाई पोलिसांनी केली. तरीही त्यांची संख्या कमी होत नव्हती. आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार गुरुवारी सातारा शहरात 178 तर सातारा तालुक्यात 477 असे एकूण 655 रुग्ण बाधित आढळले आहेत. सातारा तालुक्यात कंटेन्मेंट झोनची संख्या 281 वर पोहोचली आहे. कोरोनाचे संक्रमण झपाट्याने पसरत असताना संचारबंदीमध्ये रस्त्यावरची गर्दी कमी होईनाशी झाली आहे. त्यामुळे शहरात इतरत्र फिरणाऱ्यांच्या चाचणीचा निर्णय प्रशासनाने घेतला.
विनाकारण फिरणाऱ्यांना चाप बसणार -
प्रशासनाच्या आदेशानूसार शहरातील काेणत्याही भागात पथक विनाकारण फिरणाऱ्यांना चाप बसेल. लोकांना कोरोना संक्रमणाचे गांभीर्य कळावे हा या रॅपिड अँटिजेन टेस्ट मोहिमेचा हेतू असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दादासाहेब पवार यांनी सांगितले.