बारामती (पूणे) - टाळेबंदितही बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोषाची 4 कोटी रूपयांची उलाढाल झाली आहे. टाळेबंदी आणि अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी चिंतातुर असतानाच टाळेबंदीतही बाजार समितीत रेशीम कोषाची खरेदी विक्री सुरू होती.
देशात आणि राज्यात कोरोनाचा पादुर्भाव सुरूच आहे. परंतू शासनाचे आदेश आणि सूचनांचे पालन करून टाळेबंदी असूनही १७ एप्रिल पासून बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य यार्डात रेशीम कोष खरेदी विक्री केंद्र सुरू ठेवण्यात आले आहे. यामुळे टाळेबंदी असतानाही रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांची कोष विक्रीची सोय झाली आहे. बारामतीच्या मार्केच यार्डात राज्यातून पुणे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रेशीम कोष विक्रीसाठी येत आहेत. तसेच रामनगर, बेंगलोर, भंडारा आणि पश्चिम बंगालमधील मालदा येथील कोष खरेदीदार ऑनलाईनद्वारे कोषांची खरेदी करत आहेत.
बारामती बाजार समितीत रेशीम कोषास आतापर्यंत प्रति किलो किमान दर २४० रुपये आणि कोरड्या कोषास प्रति किलो ५४० रुपये एवढा दर मिळाला आहे. आतापर्यंत साधारण १५० ते २०० क्विंटल आवक होऊन साडेतीन ते ४ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली. रेशीम कोष हा नाशवंत माल आहे. राज्यात टाळेबंदी असल्यामुळे रेशीम कोषाची खरेदी-विक्री होत नव्हती. त्यामुळे रेशीम कोष उत्पादक शेतकरी चिंतेत होते. टाळे बंदित मालाचे नुकसान होऊ नये तसेच शेतकऱ्यांना आर्थिक हातभार व्हावा म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीने टाळेबंदी सुरू असताना १७ एप्रिल पासून रेशीम कोष मार्केट सुरू ठेवले आहे.
दरम्यान, बाजार समितीचे मोहन गायकवाड यांच्यामार्फत कर्नाटक राज्यातून आणलेले अंडी पुंज शेतकऱ्यांना वाटप करण्यात येते. शेतकऱ्यांनी रेशीम कोष विक्रीस आणताना ग्रेडिंग करून आणल्यास त्याला चांगला दर मिळेल, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अनिल खलाटे यांनी केले आहे.