रायगड - निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे 11 जूनला रायगड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खासदार शरद पवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तसेच अन्न पुरवठा, कृषिमंत्री यांनी तीन दिवसात रायगडातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौरा केलेला आहे. आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाहणी दौऱ्यानंतर ते महाविकास आघाडी सरकारवर काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरूवारी 11 जूनला मुंबई येथून सकाळी 10 वाजता स्पीड बोटने मांडवा येथे येणार आहेत. त्यानंतर साडे अकरा वाजता अलिबाग चौल, साडे बारा काशीद, 2 वाजता मुरुड राजपुरी, अडीच वाजता अगरदांडा, साडेतीन वाजता दिघी चार वाजता दिवेआगर, पावणे पाच वाजता श्रीवर्धन या ठिकाणीच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते श्रीवर्धन येथे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी दिली आहे.
निसर्ग चक्रीवादळाने अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड दौऱ्यावर आले असता तातडीची 100 कोटींची मदत जाहीर केली होती. मात्र, यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. त्यामुळे गुरूवारी फडणवीस पाहणी दौरा केल्यानंतर सरकारच्या विरोधात काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.