औरंगाबाद - कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार नुकताच चव्हाट्यावर आला आहे. असे असतानाच दुसरीकडे चिकलठाणा परिसरातील जिल्हा सामान्य रूग्णालयातून पाच इंजेक्शन चोरीला गेल्याचे समोर आले आहे. ही घटना २४ एप्रिलला सायंकाळी सहा ते साडेसातच्या घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यापुर्वी देखील रूग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शन चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. मात्र, त्यावेळी पोलिसात तक्रार देण्यात आली नव्हती.
चिकलठाणा परिसरातील जिल्हा सामान्य रूग्णालयात गेल्या वर्षभरापासून कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्हा रूग्णालयातील परिचारिका मिना जावळे (४८, रा. शारदा अपार्टमेंट, आकाशवाणी परिसर) या शनिवारी रात्रपाळीसाठी कामावर होत्या. सायंकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान मिना जावळे या वॉर्डातील दाखल रूग्णांना औषधी देण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी रुग्णालयातील फ्रिजमध्ये १६ रेमडेसिविर इंजेक्शन त्यांनी ठेवले होते.
रुग्णांना औषधी देऊन परत आल्यावर त्यांनी पुन्हा फ्रिजमध्ये इंजेक्शनची पाहणी केली. मात्र, त्यावेळी फ्रिजमधील पाच इंजेक्शन चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार तत्काळ रूग्णालयाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक संदीप बागुल करत आहेत.