हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी शहरातील काझी मौला भागात सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शहरात पाच दिवस संचारबंदी लागू करण्यात आली असून याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश काढले आहेत. तर, संचारबंदी काळात सीमेमधून कोणतेही वाहन अथवा व्यक्ती बाहेर किंवा आत जाण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चाललेली आहे. मात्र, बरे होण्याची संख्या ही बऱ्यापैकी असल्याने, यापूर्वी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी जीवनावश्यक वस्तूंची तसेच इतर दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार सर्व काही सुरळीत होते. मात्र, नव्याने येथील काझी मौला भागात सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे कळमनुरी शहरात कोरोनाचा प्रभाव वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या भागात पाच दिवस संचारबंदी लागू केली आहे.
संचारबंदी काळामध्ये शहरातील सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून या कालावधीत कोणतेही वाहन अथवा व्यक्ती आत किंवा बाहेर जाणार नाही. एवढे करुनही विनापरवानगी घराबाहेर किंवा बाजारामध्ये आढळून आल्यास संबंधिताने भारतीय दंड संहिता 860 चे कलम 188 नुसार गुन्हा़ केला, असे मानून आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे.