वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेतील केंटुकी राज्यात कृष्णवर्षीय महिलेच्या हत्येविरोधात सुरु असलेल्या आंदोलनात गोळीबाराची घटना घडली. यामध्ये एका आंदोलकाचा मृत्यू झाला असून इतरही आंदोलक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना राज्यातील सर्वात मोठ्या लुईसवेईल शहरातील जेफरसन 'स्केअर पार्क' येथे घडली.
पोलिसांनी जखमी व्यक्तींची माहिती जाहीर केली नाही. गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर लुईसवेईलमधील मेट्रो पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काल(शनिवार) रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी बचावकार्य हाती घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. यातील एका आंदोलकाचे प्राण धोक्याबाहेर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गोळीबारप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून पोलीस माहिती जमा करत आहेत. 26 वर्षीय टेलर नामक कृष्णवर्णीय महिला मार्च महिन्यात पोलिसांच्या छाप्यात मृत्यूमुखी पडली होती. तिच्या विरुद्ध 'नो नॉक वॉरंट' म्हणजेच पुर्वकल्पना न देता घरात घुसून छापा टाकण्याची परवानगी पोलिसांना होती. या कारवाईत तिचा मृत्यू झाला होता. त्यावरून आता आंदोलन सुरु झाले आहे. अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड याच्या हत्येवरून आधीपासूनच अनेक शहरात आंदोलने सुरु आहे.