चंद्रपूर - जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे. अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी पायपीट करावी लागत आहे. आशा परिस्थितीत 10 जूनला तालुक्यातील सुरेश ठमके नामक 55 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, तर चिंचोली येथील बंडू चंदे नामक शेतकऱ्याने शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.
शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत आहे. अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊनही त्यांना नवीन कर्ज मिळण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यात ही समस्या सर्वात जास्त आहे. अशातच राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील बंडू दादाजी चंदे या युवा शेतकऱ्याने काल रात्री घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्राथमिक चौकशीत शेतकऱ्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज होते. त्यामुळे नवीन कर्ज कसे मिळेल या विवंचनेत तो होता. अशातच या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून शेतकऱ्यांना बँकांकडून अडवणूक केली जात असल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.