नवी दिल्ली - भारताची महिला धावपटू दुती चंदने गेल्या दिवसांपासून एका मुलीसोबत समलैगिंक संबंधात असल्याचे कबूल केले आहे. लोक तिच्या पार्टनरला टीकेचे धनी बनवतील या भीतीने २३ वर्षीय दुतीने तिच्या जोडीदारीणीचे नाव स्पष्ट केले नाही. दुतीने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत २०१८ च्या आशियाई स्पर्धेत दोन रौप्य पदक जिंकले आहेत.
दुती सध्या टोकियो येथे होणाऱ्या स्पर्धेची तयारी करत आहे. दुती समलैंगिक संबंध असल्याचे कबूल करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. दुती याबाबत बोलताना म्हणाली, की प्रत्येकाला कोणासोबत राहायचे आहे याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मला माझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती भेटली आहे. मी नेहमीच समलैगिंक संबंधात असलेल्या लोकांची बाजू मांडली आहे. मी सध्या वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि ऑलिम्पिकच्या तयारीवर लक्ष देत आहे. भविष्यात मला त्या मुलीसोबतच राहायचे आहे.
दुती पुढे बोलताना म्हणाली, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. याचा स्वीकार केला पाहिजे. देशासाठी पदक जिंकण्यासाठी मी प्रयत्न करेल. गेल्या दहा वर्षापासून मी पदकासाठी धावत आहे. गतवर्षी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत आयपीसीच्या सेक्शन 377 ला गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर केले, त्यामुळेच मी हे सार्वजनिकरित्या बोलू शकले.