नांदेड - कर्तव्यावर जाण्यासाठी निघालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे वाहन अडवून दारूड्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार लोह्यात घडला आहे. राजेंद्र कऱ्हे असे या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. कऱ्हे कर्तव्यावर जात असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी दोनही आपरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र कऱ्हे हे शनिवारी दुपारी आपल्या खासगी वाहनाने मुक्ताईनगर मार्गे पोलीस ठाण्याकडे जात होते. यावेळी मागून येणाऱ्या नागेश गोविंद आंबेकर आणि तानाजी चव्हाण दोघे (रा. लोहा) हे मधून जात होते. दारुच्या नशेत असल्याने त्यांना समोर लोहा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गाडी चालवत आहेत हे माहित असतानाही त्यांनी नशेत जोर जोराने हॉर्न वाजवुन गाडी वेडी वाकडी चालवली. काही अंतरावर गेल्यानंतर चक्क त्यांनी आपली कार निरीक्षक कऱ्हे यांच्या वाहनासमोर लावून त्यांची गाडी अडविली. दारुच्या नशेत गोंधळ घालून वर्दीवर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कऱ्हे यांना शिविगाळ करत मारहाण केली. हा प्रकार रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेकांनी पाहिला. यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.