मीरा भाईंदर (ठाणे)- मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार डॉ. विजय राठोड यांनी आज स्वीकारला आहे. मंगळवारी नवी मुंबई, उल्हासनगर आणि मीरा भाईंदर आयुक्तांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या होत्या. चंद्रकांत डांगे यांची बदली करून मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त पदी डॉ. विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली.
तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांची फेब्रुवारी महिन्यात मीरा भाईंदर आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, मीरा भाईंदरमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने डांगे यांची बदली केल्याची चर्चा सुरू आहे.
आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास डॉ. विजय राठोड हे महानगरपालिकेच्या मुख्यकार्यालयात दाखल झाले. आयुक्त दालनात त्यांनी महानगरपालिकेतील प्रमुख प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. गेल्या ८ वर्षांत 8 आयुक्त मीरा भाईंदर शहराला लाभले. पण एकही आयुक्तांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला नाही. आता डॉ. विजय राठोड नक्की किती दिवस आयुक्तपदी असतील हे येणाऱ्या कळताच समजेल.