हिंगोली - जिल्ह्यात कोरोना रुग्णालयात एका कोरोनाबाधित रुग्णाचे यशस्वीपणे डायलिसिस करण्यात आले आहे. अशाप्रकारे एखाद्या कोरोनाबाधित रुग्णावर यशस्वी डायलिलीस करण्याची ही पहिलीच वेळ असून यामुळे रुग्णालय कर्मचाऱ्याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
ओंढा नागनाथ ते हिंगोली रस्त्यावरील नव्याने उभारलेल्या कोरोना रुग्णालयात नव्यानेच उभारण्यात आलेल्या डायलिसिस विभाग उभारण्यात आला आहे. यामुळे डायलिसिसवर जगणाऱ्या रुग्णांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. ऐरव्ही डायलिसिस करण्यासाठी रुग्णांना प्रत्येक वेळी औरंगाबाद, नागपुर, अकोला, नांदेड आदी ठिकाणी धाव घ्यावी लागत होती. मात्र हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या डायलिसिस विभागामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळण्यास मदत झाली आहे. ज्या रुग्णांचे डायलिसिस सुरू आहे अशा रुग्णांसाठी आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस करणे नितांत गरजेचे असते, त्यामुळे हा खर्च प्रत्येक रुग्णांना पूर्वी न परवडण्यासारखा होता. मात्र हिंगोली येथेच हा विभाग सुरू झाल्याने, अनेक डायलिसिस रुग्णांना नवसंजीवनी मिळाली असून, रुग्णासह नातेवाइकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलण्यासाठी मदत झाली आहे. असाच एक रुग्ण ज्यावर येथील डायलिसिस विभागात नियमित डायलिसिस करण्यासाठी येत असताना, त्याचा कोरोना बाधित आढळून आला तरीही डायलिसिस विभागातील कर्मचारी अजिबात घाबरून न जाता दोन्ही किडण्या निकाम्या झालेल्या रुग्णाचे यशस्वी डायलिसिस केले.
सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. आतापर्यंत येथे 1176 रुणांचे डायलिसिस करण्यात आले आहे. त्यापैकी हा पहिलाच रुग्ण आहे ज्याला कोरोनाची लागण झाली असूनही त्याचे यशवी डायलिसिस केले. जिल्हा शल्यचिकित्सक व अतिरिक्त शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली डायलिसिस विभागातील वैद्यकिय अधिकारी डॉ. तुकाराम आऊलवार, वैज्ञानिक अधिकारी एजाज पठाण, संतोष गिरी, जयश्री परदेशी, अधिपरिचारिका जिजा रुंजे यांनी रुग्णाला जीवदान दिले.