अहमदनगर - भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनीही आज अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे भाजपकडून अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नगर लोकसभा मतदारसंघात आज (गुरुवार) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. यावेळी शेवटच्या क्षणी भाजपचे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सौभाग्यवती धनश्री विखे पाटील यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर संजना चंद्रशेखर कोळसे अनुमोदक व सुचक या आहेत. धनश्री विखेंनी देखील भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
डॉ. सुजय यांची पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली असताना धनश्री विखेंनी भाजपकडून अर्ज दाखल केला असला तरी हा अर्ज ‘डमी’ असल्याचे बोलले जात आहे. हा अर्ज भरल्याने नगरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.