ठाणे - महिला कर्मचाऱ्याला अपशब्द वापरल्याप्रकरणी भिवंडी महापालिका आयुक्तांनी महापालिका उपायुक्तांजवळील डझनभर पदाचा कार्यभार काढून घेतला आहे. त्यामुळे महिला लिपिक कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणे या उपायुक्तांना भोवल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
भिवंडी शहर पालिकेच्या आस्थापन विभागात काम करणाऱ्या लिपिक महिलेस पालिकेचे उपायुक्त दीपक कुरळेकर यांनी अपशब्द वापरल्याने ही महिला उपायुक्तांच्या दालनातच बेशुद्ध पडल्याची घटना भिवंडी महापालिकेत काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. उपायुक्त कुरळेकरांवर कारवाई व्हावी, यासाठी महिला कर्मचाऱ्यांसह कामगार कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला होता. या घटनेनंतर उपायुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. मात्र, उपायुक्तांवर कारवाई कारण्यात यावी, अन्यथा उपायुक्त कामावर हजर झाल्यास त्यांच्या तोंडाला काळे फसण्यात येईल, असा इशारा कामगार कृती समितीच्या वतीने देण्यात आला होता.
अखेर मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी कामगार कृती संघटनेचा वाढता विरोध लक्षात घेत उपायुक्त दीपक कुरळेकर यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग मुख्यालय तसेच अनधिकृत बांधकाम विभाग, शहर विकास विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग, भविष्य निर्वाह निधी विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग, निवडणूक विभाग, दूरध्वनी विभाग, स्थानिक संस्था कर विभाग, जनगणना विभाग, संगणक विभाग अशी एकूण बारा विभाग होते. यातील अनधिकृत बांधकाम विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थाकर हे विभाग वगळता इतर विभागांची जबाबदारी उपायुक्त कुरळेकर यांच्याकडून डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी काढून घेतली आहेत. मनपाच्या उपायुक्त नूतन खाडे यांच्याकडे या अकरा विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आयुक्तांनी केलेल्या या कारवाईचे कामगार कृती समितीकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.