नागपूर : चार दिवसांपूर्वी नागपुरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये केटी-१ (KT-1) नावाच्या वाघाचा अचानक मृत्यू झाला होता. शारीरिक रुपाने सक्षम असलेल्या वाघाच्या मृत्यूसंदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मृत वाघाची कोरोना चाचणी करण्याच्या उद्देशाने नमुने नागपुरातील शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तर, रक्ताचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या नामुन्यांचा अवहाल आज (शुक्रवार) रात्री उशिरा येण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारा येथून १० जून रोजी केटी-१ वाघाला बंदिस्त करण्यात आल्यानंतर त्याला ११ जून रोजी नागपुरातील गोरेवाडा रेक्यु सेंटरला आणण्यात आले होते. प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या निर्देशानुसार कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून हा वाघ क्वारंटाइनमध्ये होता. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोलारा प्रवेशद्वाराजवळच्या गावात या वाघाची दहशत होती. फेब्रुवारीपासून जून महिन्यापर्यंत त्याने जंगलात गेलेल्या 5 व्यक्तींना ठार केले होते. ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये वाघाची ओळख पटवल्यानंतर प्रधान मुख्य वन संरक्षकांनी या वाघाला पकडण्याचे आदेश दिले. त्यानंतर, वन विभागाने 10 जूनला वाघाला बेशुद्ध करून पकडल्यावर 11 जूनला नागपुरच्या गोरेवाडा बचाव केंद्रात आणण्यात आले होते.
सुमारे ११ दिवस विलगीकरणात असताना २२ जून रोजी केटी-१ हा वाघ मृतावस्थेत आढळून आला. सुरुवातीला वाघाचा मृत्य सर्पदंशाने झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, त्यासंदर्भांत वाघाच्या शरीरावर कोणतेच व्रण आढळलेले नाही. शिवाय शवविच्छेदन केल्यावर वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण समजले नसल्याने त्या वाघाची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.