ठाणे- पेट्रोल डिझेलचे गेल्या 3 आठवड्यापासून दर वाढत असल्याचे दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर आज मीरा भाईंदर जिल्हा काँग्रेसच्या वतीने भाईंदर पोलीस ठाणे ते मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयापर्यंत केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला.
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या संकटामुळे आधीच हैराण झालेले नागरिक आता कुठेतरी थोडी शिथिलता आल्यानंतर कामाला सुरुवात करत होते. त्यातच पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत असल्यामुळे वाहन चालवणे कठीण झाले आहे.
इंधनाचे भाव वाढत असल्याकारणाने केंद्र सरकारच्या विरोधात भाईंदरमध्ये काँग्रेसने मोटारसायकलची अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त केला आहे. यावेळी मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय राठोड तसेच तहसीलदार देशमुख यांना लेखी पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष अंकुश मालुसरे, युवा जिल्हा अध्यक्ष दिपक काकडे, काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते.