बिजींग- चीनमध्ये आज(बुधवार) कोरोनाचे नव्याने 100 रुग्ण आढळून आले आहेत. देशातील झिंनजियांग प्रांतात कोरोनाचा प्रसार अजून नियंत्रणात आलेला नसून मागील काही आठवड्यांतील ही सर्वात मोठी रुग्णांची वाढ आहे. देशाच्या उत्तर पूर्वेकडील झिंजियांग प्रांतात 89 रुग्ण आढळून आले आहेत. तर इतरही प्रांतात कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा चीनकडून करण्यात येत असतानाच पुन्हा नव्याने रुग्ण आढळून येत आहेत.
चीनच्या उत्तर पूर्वेकडील प्रांतात 8 रुग्ण आढळून आले असून 3 रुग्ण परदेशातून आलेल्या नागरिकांमधील आहेत. झिंजियांग प्रांत सोडता इतर प्रांतातील कोरोनाच्या प्रसारावर नियंंत्रण मिळविण्यात चीनला यश आले आहे. चीनधील मृतांचा आकडा आत्तापर्यंत 4 हजार 634 असून 84 हजार 60 रुग्ण नोंदवले गेले आहेत. चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहरातून सर्वात प्रथम कोरोनाचा प्रसार झाला. त्यानंतर सर्व जगभर कोरोना पसरला. मात्र, इतर देशांच्या तुलनेत चीनला कोरोनावर लवकर नियंत्रण मिळवता आले आहे.
झिंजियांग प्रांतातील उरुमकी या शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाने येथे निर्बंध लागू केले आहेत. तर कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहेत. अमेरिका, भारत, ब्राझील या देशांच्या तुलनेत चीनमधील रुग्ण संख्या कमी आहे.