बीजिंग - तिबेट मुद्द्यावरून चीनने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या व्हिसावर निर्बंध लादल्याचे वृत चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिले आहे. अमेरिकेने 'रेसिप्रोकल अॅक्सेस ऑफ तिबेट' कायद्यानुसार काही चिनी अधिकाऱ्यांच्या व्हिसावर निर्बंध घातल्यानंतर आता चीननेही अमेरिकेच्या या कृतीला प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेचे नागरिक, राजनैतिक अधिकारी, पत्रकार आणि पर्यटकांना चीन तिबेटमध्ये जाऊ देत नसल्याची अमेरिकेची अनेक दिवसांपासूनची ओरड आहे.
तिबेट मुद्द्यावरुन अमेरिकेचे काही अधिकारी चुकीचे वागत आहेत. त्यांची कृती योग्य नाही, त्यामुळे त्यांच्यावर व्हिसा निर्बंध लावण्यात येत आहेत, असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिंग यांनी सांगितले. तिबेटसंबधी योजना आखणाऱ्या आणि परदेशी नागरिकांना तिबेटमध्ये कसा प्रवेश द्यावा यासंबंधी अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या व्हिसावर निर्बंध घालण्याची घोषणा अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पोम्पेओ यांनी आधी केली होती. त्यावर आता चीनकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
प्रादेशिक शांततेसाठी तिबेटमध्ये जाता येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चीनकडून या भागात मानवी हक्कांचे उल्लंघनही करण्यात येत आहे. तसेच आशियातील काही महत्त्वाच्या नद्यांच्या उगमाजवळ पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यात चीनला अपयश आले आहे, असे पोम्पेओ म्हणाले होते.
अमेरिकेच अधिकारी, पत्रकार, राजनैतिक अधिकारी आणि पर्यटकांना तिबेटमध्ये जाण्यापासून चीन नियोजपूर्वक रोखत आहे. मात्र, चीनी अधिकारी आणि नागरिकांना संपूर्ण अमेरिकेत जाता येते, असे पॉम्पेओ यांनी म्हटले. तिबेटच्या प्रादेशिक स्वायत्ततेसाठी अमेरिका कटिबद्ध असल्याचे पोम्पेओ म्हणाले होते. अमेरिकेने चीनवर निर्बंध आणण्यासाठी ‘रेसिप्रोकल अॅक्सेस ऑफ तिबेट’ हा कायदाही पास केला आहेे.