पंढरपूर - तालुक्यातील ओझेवाडी येथून भीमा नदीपात्रातून तलाठीच्या बांधकामासाठी अवैधरित्या वाळू चोरून घेऊन जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये तलाठ्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये दोन टिपर व आठ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सहा जणांवर गुन्हे दाखल..
खोजेवाडी येथून अवैधरित्या वाळू उपसा करून घेणाऱ्या दोन टिपर चालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये रवींद्र पाटोळे, गणेश बागल, विशाल अवताडे, बापू कुंभार, सावकार गायकवाड, तलाठी अमर पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
पंढरपूर तालुका पोलीस पथकाची कारवाई….
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी येथून तालुका पोलीस स्टेशन ते नवीन कराड नाका येथे अवैधरित्या वाळू उपसा केली जाणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गाडेकर यांना मिळाली. गाडेकर यांच्या पथकाने पंचायत समिती समोर थांबा धरला. पंढरपूर पंचायत समिती येथून एकामागोमाग जाणाऱ्या दोन टिपरला थांबवण्यात आले. त्यावेळी टिपर चालक रवींद्र पाटोळे व गणेश बागल यांच्याकडे शासनाचा वाळू उपसा करण्याचा कोणताही परवाना नसतानाही वाळू घेऊन चालले होते. त्यावेळी पोलिसांनी चौकशी केली असताना ही वाळू तलाठी अमर पाटील यांच्या बांधकामासाठी घेऊन जात असल्याचे समोर आले.
पाच जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी
अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. या पाच जणांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पाच जणांना एक दिवशी पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर जेसीबी मालक सावकार गायकवाड याला रात्री उशिरा पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर यांनी दिली.
हेही वाचा - शिकारी श्वानांच्या साह्याने उदमांजरांची शिकार, 10 जणांवर गुन्हा दाखल
हेही वाचा - औरंगाबाद : पतीने दुसरा विवाह करून पैशांसाठी पहिल्या पत्नीचा केला छळ