अमरावती- गांजा तस्करी करणाऱ्यांची गाडी रोखताच पोलिसांवर दगडफेक करून तस्कर पसार झाल्याची घटना जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांना एका आरोपीची ओळख पटली आहे. झिशान अली उर्फ शूटर असे त्याचे नाव असून पोलिसांनी 2 लाख 92 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, काल सरमसपुरा पोलीस ठाणे हद्दीत अधीक्षकांचे जिल्हा विशेष पोलीस पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. दरम्यान एक व्यक्ती मारुती ओमनी व्हॅनमधून गांजाची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सरमसपुरा पोलीस ठाणे हद्दीतील रेल्वे रुळाजवळील रस्त्यावर नाकाबंदी केली. त्यानंतर या मार्गावरून अचलपूरकडे एक मारुती ओमनी व्हॅन क्र. (एमएच 37 ए 0459) जात होती. या व्हॅनला पोलिसांनी रोखले. मात्र, असे करताच व्हॅनमधील आरोपींनी पोलिसांवर दगडफेक केली व घटनास्थळावरून पसार झाले.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांना एका आरोपीची ओळख पटली आहे. झिशान अली उर्फ शूटर असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी अंदाजे 11 किलो गांजा ज्याची किंमत अंदाजे 1 लाख 32 हजार रुपये व मारुती ओमनी व्हॅन किंमत अंदाजे 1 लाख 60 हजार रुपये असा एकूण 2 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांकडून एकूण 3 आरोपींचा शोध सुरू आहे.