अकोला - जिल्ह्यात केवळ 17 टक्के शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्ज दिले आहे. राज्य सरकारची कर्ज माफी फसवी असून दोन्ही टप्प्यांपैकी जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांसह राज्य सरकार संचालित असलेल्या बँकांनी केवल 40 टक्के शेतकऱ्यांनाच खरीप पिकासाठी कर्ज पुरवठा केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याने आज जिल्ह्यातील 10 हजार भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रतिकात्मक आंदोलन केले आहे.
जर 8 दिवसात शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा खरमरीत इशारा जिल्हा भाजप अध्यक्ष व आमदार रणधीर सावरकर यांनी दिला आहे. तसेच, शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे येऊन सुद्धा त्यांना देण्यात येत नाहीत. 6 महिन्यापासून शेतकऱ्यांवर अन्याय सुरू आहे. वारंवार या संदर्भात सूचना दिल्यावर सुद्धा राज्य सरकार आदेश देत नाही. हा प्रकार निंदनीय आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आश्वासन देणारे आघाडी सरकार शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करत आहे, अशी माहिती आमदार सावरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
त्याचबरोबर, पीक विमा कंपन्यांनी रक्कम जमा केल्यावर सुद्धा सदर रक्कम शेतकऱ्यांना का देण्यात येत नाही. तसेच जिल्ह्यात 3 लाख शेतकरी बँकेतून कर्ज घेतात, त्यापैकी आता पर्यंत 17 टक्के शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. याचे आकडेनिहाय माहिती देखील आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पाफळकर याना आपल्या निवेदनासोबत दिली.
आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात जयप्रकाश नारायण चौक, खुले नाट्य गृहासमोर स्थित बँक ऑफ इंडिया येथे भाजपा कार्यकर्त्यांनी एस.आर. कवर शाखा व्यवस्थापक यांना घेराव घालून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. या बँकेत 578 शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले. त्यापैकी 294 शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली. त्यापैकी फक्त 152 शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली. हीच परिस्थिती सर्व बँकांची असून या निमित्त आमदार सावरकर यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या आंदोलनात तेजराव थोरात, विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, माधव मानकर, डॉ. विनोद बोर्डे, जयंत मसने, गिरीश जोशी, आदी सहभागी झाले होते.