अहमदनगर- महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कोरोना सहायता निधीकरिता 10 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात इंद्रजीत भाऊ थोरात व कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी प्रांताधिकारी शशिकांत मंगळूरे यांच्याकडे 10 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श विचार तत्वांवर चालणारा हा कारखाना असून या कारखान्याने कायम उच्चांकी भावासह सामाजिक बांधिलकीची परंपरा जोपासली आहे. तालुक्यातील नागरिकांच्या प्रत्येक सुख दु:खात कारखान्याने सहभाग घेतला आहे. तसेच ग्रामीण विकासात मोठे योगदान दिले आहे.
कोरोणा हे मानवजातीवरील संकट आहे. संगमनेर तालुक्यातील काही वाढलेले रुग्ण ही चिंतेची बाब असून नागरिकांनी सामाजिक अंतर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सहायता निधी करता कारखान्याच्या वतीने 10 लाख रुपयांचा निधी दिला जात आहे. तसेच थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, एनएसयूआय व विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने मागील 3 महिन्यात मोफत अन्न वाटप, सॅनिटायझर व मास्कचे वाटप अशा विविध उपाय योजनाही राबवल्या असल्याचे बाबा ओहोळ म्हणाले.
यावेळी तहसीलदार अमोल निकम, बँकेचे अध्यक्ष अमित पंडित, उपाध्यक्ष संतोष हासे, दत्तात्रय खुळे, नानासाहेब शिंदे, सुभाष गुंजाळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, शरद गुंजाळ आदी उपस्थित होते.