मुंबई - आपल्या प्रकृतीसंदर्भात प्रसार माध्यमात काही ठिकाणी प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असल्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे. राजभवनमध्ये जवळपास 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर खुद्द राज्यपाल विलगीकरणात गेल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून पुढे आल्या होत्या. त्यावर ‘आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नसल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे.
आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणामदेखील नकारात्मक आले आहेत. कोरोनाची लक्षणेदेखील आपल्यात दिसून आली नाहीत. मात्र, इतरत्र असलेली परिस्थिती पाहून आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहे. या संदर्भात माझ्या प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी येत असलेले वृत्त निराधार आहे. माझी प्रकृती चांगली आहे, असे राज्यपालांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.