पुणे- लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच बारामती शहरात नागरिकांच्या वर्दळीसह दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर, तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आत्तापर्यंत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 2 महिन्यात तब्बल 17 लाख 51 हजार 400 रुपये दंड आकारण्यात आला आहे.
बारामती शहर कोरोनामुक्त झाल्यानंतर शहरातील व्यापाऱ्यांच्या मागणीवरून बाजारपेठा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बाजारपेठा सुरू होताच शहरात पुन्हा पूर्वीसारखीच वर्दळ सुरू झाली आहे. यात विनाकारण फिरणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी बारामतीच्या वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार विना परवाना वाहन चालवणे तसेच नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, वाहन चालवतांना मोबाईलचा वापर करणे, तसेच ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्यांवर 2 महिन्यात तब्बल 17 लाख 51 हजार 400 रुपये दंड आकारण्यात आला आहे.
यापुढेही वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे नियम मोडणारे व वर्दळीच्या रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने पार्क करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरूच राहणार असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले आहे. शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश चव्हाण, पोलीस नाईक अभिजित कांबळे, पोलीस नाईक अभिजीत ऐकशीगे, महिला पोलीस नाईक धुमाळ, महिला पोलीस नाईक साबळे, पोलीस शिपाई अजिंक्य कदम यांनी कारवाई केली आहे.