ढाका - ‘खरी अयोध्या आणि भगवान रामाचे जन्मस्थान नेपाळमध्ये असून भारतात नाही’, असे वक्तव्य नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी नुकतेच केले होते. यावरून आता वाद सुरु झाला आहे. बांगलादेशात राहणाऱ्या हिंदुंनी ओलींच्या वक्तव्यावर आक्षेप घेत आंदोलन सुरु केले आहे. ‘अदृष्य शक्ती’ नेपाळला भगवान रामाबद्दल दिशाभूल करणारे वक्तव्य करण्यास भडकावत आहेत, असे आंदोलक म्हणाले.
‘हिंदू धर्म सुरक्षा परिषद’ आणि ‘बांगलादेश हिंदू ग्रँड अलायन्स’ या संघटनांनी ‘जातीय प्रेस क्लब’ बाहेर मानवी साखळी करत ओलींच्या वक्तव्याविरोधात आंदोलन केले. अयोध्या नेपाळमध्ये असून भगवान रामाचा जन्म दक्षिण नेपाळमधील तोरी येथे झाल्याचे वक्तव्य 13 जुलै रोजी पंतप्रधान ओली यांनी केले होते. 17 जुलैलाही जागृत हिंदू समाज संघटनेने ढाका प्रेस क्लब बाहेर आंदोलन केले होते.
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान ओलींच्या वक्तव्यानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. भगवान राम आणि त्यांच्या स्थानांसंंबंधी अनेक दंतकथा आहेत. त्यामुळे यासबंधी आणखी संशोधन आणि अभ्यासाची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. अयोध्या आणि रामाशी संबंधीत सांस्कृतीक ठिकाणांचा अपमान करण्याचा पंतप्रधानांचा हेतू नव्हता असे, नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालायने म्हटले आहे.
के.पी. ओली यांच्या भारताविरोेधी वक्तव्यामुळे नेपाळच्या विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. सत्ताधारी नॅशनल कम्युनिस्ट पार्टीने त्यांचा राजीमानाही मागितला आहे. नेपाळ आणि भारतामध्ये मागील काही महिन्यांपासून सीमावादही सुरू झाला आहे. लिपूलेक, लिम्पियाधुरा आणि कालापाणी हे भारताच्या हद्दीतील प्रदेश नेपाळनेे त्यांच्या नकाशात समाविष्ट केले आहेत.