अयोध्या - येत्या 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुप्रतिक्षित भव्य राम मंदिरासाठी 'भूमीपूजन' होणार आहे. यासाठी पवित्र अयोध्या शहराचे सुशोभिकरण केले जात आहे. लोक ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. राम मंदिर बांधण्यास संमती असलेले मुस्लिमही पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी तयारी करत आहेत. अयोध्येतील मुस्लीम महिलांनी पंतप्रधान मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांच्यासाठी खास राख्या बनवल्या आहेत.
रामलल्लासाठीही खास राखी
5 ऑगस्ट 2020 हा दिवस रोजी अयोध्येच्या गौरवशाली इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. हे पवित्र शहर सजवण्यासाठी व याचा जीर्णोद्धार करण्यात अयोध्येतील जनता जोरदार कामाला लागली आहे. हा प्रसंग गंगा-जमुनी संस्कृतीच्या सह-अस्तित्वाचे उत्कृष्ट उदाहरणही बनेल. मुस्लीम महिलांनी बनवलेल्या राख्यांना पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते यांना पोस्टाद्वारे पाठविले जाईल. तसेच, या महिला 5 ऑगस्ट रोजी श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या माध्यमातून या राख्या राम लल्लांकडेही सादर करतील.
देशभरात ऐक्य आणि शांततेसाठी प्रार्थना
या बहुप्रतिक्षित प्रसंगी सर्व जनतेमध्ये शांती आणि एकमेकांविषयी प्रेमपूर्वक बंधुभाव असावा, यासाठी या महिलांनी प्रार्थनाही केली. देशवासियांमध्ये ऐक्य कायम रहावे, यासाठीही त्यांनी प्रार्थना केली. या महिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक राम मंदिर-बाबरी मशीदच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला.