कॅनबेरा - मागील काही दिवसांपासून चीनने शेजारील देशांशी आणि त्यांच्याच काही प्रदेशात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. यातील एक उदाहरण म्हणजे हाँगकाँग. येथील लोकशाहीवादी व्यवस्था आणि चळवळ कमजोर करण्यासाठी चीनकडून कठोर कायदे लादण्यात येत आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियने हाँगकाँगसोबतचा प्रत्यार्पण करार रद्द केला आहे. त्यामुळे आता चीनने गुन्हेगार ठरवलेला हाँगकाँगमधील कोणताही व्यक्ती ऑस्ट्रेलियात राहत असेल तर त्याला चीनकडे सुपुर्द करण्यात येणार नाही.
राजधानी कॅनबेरा येथे पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिस यांनी ही माहिती दिली. चीनने हाँगकाँगमध्ये लागू केलेला राष्ट्रीय सुरक्षा कायद्यामुळे प्रत्यार्पण कायद्यासंदर्भातील परिस्थितीत मुलभूत बदल घडून आले आहेत. यासंबंधी हाँगकाँग आणि चीनला माहिती देण्यात आल्याचे मॉरिस यांनी सांगितले.
हाँगकाँगमधील नागरिकांना जर देश सोडून ऑस्ट्रेलियात यायचे असेल तर व्हिसाही देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकत्व मिळण्यासही सोपे होणार आहे. यासोबतच ऑस्ट्रेलियाने हाँगकाँगमध्ये जाणाऱ्या नागरिकांसाठी प्रवासाविषयक नियमावली जारी केली आहे. अस्पष्ट कायद्याच्या कलमांखाली ऑस्ट्रेलियन नागरिकांना अटक होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा उगम कसा झाला. याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी ऑस्टॅलियाने केली होती. त्यामुळे चीनचा पारा चढला होता. या कृतीला प्रत्युत्तर म्हणून चीनने ऑस्ट्रेलियाचे बीफ, बार्ली आणि इतर आयात करण्यात येणाऱ्या मालावर निर्बंध लावले. तेव्हापासून दोन्ही देशांतील संबध तणावाचे झाले आहेत. नुकतेच ऑस्ट्रलियाने संरक्षण क्षेत्र मजबूत करण्यासाठी मोठ्या रकमेची तरदुत केली असून 10 वर्षांचे नियोजन केले आहे.