कोलकाता - केकेआरने यावर्षी आयपीएलमध्ये सलग दोन सामन्यात बाजी मारत धमाका केला आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात त्यांनी पंजाबला २८ धावांनी हरविले. या सामन्यात पंजाबचा कर्णधार आर. अश्विन याने नियम मोडल्याचा फायदा आंद्रे रसेलने घेत सामन्याचा नूरच पालटला. त्यात पंजाबचा पराभव झाला. अश्विनची ही चूक संघाला चांगलीच भोवली.
सामन्यात झाले असे की, १७ व्या षटकात शमीने आंद्रे रसेलला एका परफेक्ट यॉर्करवर क्लीन बोल्ड केले. रसेल लवकर बाद झाल्याने पंजाबच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले तर केकेआरच्या गोटात शांतता पसरली. पण ३० यार्ड सर्कलच्या आत पंजाबचे तीनच खेळाडू असल्याने पंचानी तो नोबॉल ठरविला. नियमानुसार सर्कलच्या आत ४ खेळाडू पाहिजे. त्यामुळे रसेलला पुन्हा फलंदाजी करण्याची संधी मिळाली. यावेळी आंद्रे रसेल ५ चेंडूत ३ धावा काढल्या होत्या. अश्विनची ही चूक संघाला चांगलीच महागात पडली.
मिळालेल्या संधीचे सोने करत कोलकात्याचा स्टार फलंदाज आंद्रे रसेल पंजाबच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने १७ चेंडूत ३ चौकार आणि ५ खणखणीत षटकार लागावत ४८ धावांची खेळी केली. त्यामुळे कोलकात्याला २०० पेक्षा जास्त धावसंख्या उभारता आली.