जयपूर (राजस्थान) - राजस्थान काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी नाराजी दर्शवल्यानंतर गेले 3 दिवस राजस्थानमध्ये सत्तानाट्य सुरू आहे. अशातच आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निकटवर्तीय आमदार आणि इतर नेत्यांच्या संपत्तीवर आयकर विभाग आणि ईडीकडून (सक्तवसुली संचालनालय) छापा टाकण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा या प्रकरणाला नवीन ट्विस्ट आला आहे. त्यामुळे हा संघर्ष आता थेट केंद्र सरकार आणि राज्य सरकार असा सुरू झाला आहे.
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार 300 अधिकाऱ्यांच्या टीमने दिल्ली, राजस्थान आणि मुंबई येथील 43 ठिकाणी छापा टाकला आहे. तसेच संबंधीतांकडे करोडो रुपयांची बेनामी संपत्ती असल्याचे आयटी विभागाने सांगितले आहे.
राजीव अरोरा, धर्मेंद्र राठोड यांच्यासहित इतर काँग्रेस नेत्याच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. अरोरा आणि राठोड हे मुख्यमंत्री गेहलोत यांचे खूप निकटवर्तीय मानले जातात. नोंद नसलेली रोख रक्कम, सोने, संपत्तीचे कागदपत्रे आणि लोकर्स हे आयकर विभागाने जप्त केले आहेत. तसेच भिलवाडा आणि झालवाड येथिल काही ठिकाणी आयकर विभागाने कारवाई केली.
आयकर विभाग आणि ईडीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसची विधिमंडळ सदस्यांची सोमवारची नियोजित बैठक ही काही तासांसाठी काँग्रेसने पुढे ढकलली. यावेळी काँग्रेस पक्षाचे व्हीप महेश जोशी आणि प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवला यांनी भाजप सरकारी संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला.