परभणी - ज्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गंगाखेड येथे 'हलगीनाद' आंदोलन करण्यात आले. श्री.संत जनाबाई महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले. यावेळी मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
'कोरोना'मुळे लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली. गेल्या 24 मार्चला राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तेव्हपासून अनेकांचे रोजगार गेले. व्यवसाय ठप्प झाले आहेत. आता 'अनलॉक' च्या प्रक्रियेत हळूहळू सर्व सुरळीत होत असले तरी मागच्या महिन्यातील बेरोजगारीमुळे पालकांकडे विद्यार्थ्यांच्या फिस भरण्यासाठी पैसे नाहीत. अनेक विद्यार्थ्यांची यामुळे हेळसांड होत असून, महाविद्यालयांनी ही परिस्थिती लक्षात घेऊन महाविद्यालयीन शुल्क आकारू नयेत. तसेच यापुढे भरून घेतलेल्या शुल्क देखील परत करावेत, या मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी 'चालु शैक्षणिक वर्षाचे शुल्क 30 टक्के कमी करणे आणि प्रवेशाच्या वेळी 15 टक्के शुल्क घेऊन इतर शुल्क 4 टप्प्यात घेणे, ज्या विषयांचे ऑनलाईन क्लास अद्याप सुरु झालेले नाही त्यांचे क्लास लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, प्रवेशासाठी फॉर्मच्या नावाखाली विना पावती घेतले जाणारे 100 ते 200 रुपये माफ करणे व आतापर्यंत आकारलेले शुल्क प्रत्येक विद्यार्थ्यांला परत करण्यात यावे, मार्कमेमो देण्यासाठी विनाकारण घेतले जाणारे शुल्क परत करणे आणि पुढे कधीही अशाप्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नयेत अशा मागण्या करण्यात आल्या.
तसेच, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांकडुन प्रवेशाच्या वेळी पावती न देता घेतले जाणारे 500 रुपये शुल्क संबंधित विद्यार्थ्यांना परत करण्यात यावे, आदी मागण्याही विद्यार्थ्यांनी यावेळी केल्या.
या आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहर सहमंत्री अजय टोले, सचिन पारवे, शामसुंदर सोडगिर, वैशाली कांबळे, श्रुती डबडे, दीप्ती डबडे, शाम कातकडे, शिवानंद यशवंतकर, प्रसाद लोखंडे, अनुराग तळणकर, गोपाळ तळणकर, सिद्धेश्वर नागरगोजे, दिनेश सुयंवशी, बाळाजी सावळे, अझीम शेख,विठ्ठल होरे, नारायण गोडवणे, साई टाक यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.