पुणे - पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनिकेत अशोक तरकसे या विद्यार्थाने दहावीच्या परीक्षेत यश संपादन करत 74.80 टक्के गुण मिळवले आहेत. अनिकेतची आई कंत्राटी पद्धतीने कचरा गोळा करण्याचे काम करते, तर वडील हे खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. दोघांचा मिळवून कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल इतकाच पगार मिळतो. मात्र, आर्थिक परिस्थिती ठीक नसतानाही अनिकेतने परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
अत्यंत सामान्य कुटुंबातील अनिकेत हा उद्यमनगर येथील क्रीडा प्रबोधनी शाळेतून दहावी उत्तीर्ण झाला. अभ्यासासह अनिकेतला खेळाचीही आवड आहे. तसेच, त्याने मोठे होऊन पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आहे. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी अनिकेत सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास अभ्यास करायचा. आणि आज त्याच्या मेहनतीला फळ लाभले आहे. अनिकेत 74.80 टक्के गुणांसह दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. हलाखीच्या परिस्थितीवर मात करत त्याने हे यश खेचून आणले आहे. यावेळी मिळालेल्या वेळेत तो आपले छंद पूर्ण करत असतो, असे त्यानी सांगितले.
दरम्यान, मुलाने आमचे नाव उंचावले असून आम्हाला त्याचा अभिमान असल्याची भावना अनिकेतच्या आईने व्यक्त केली आहे.