ठाणे- भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथील समुद्रकिनाऱ्यावर एक मृत डॉल्फिन मासा आज सकाळी 9 च्या सुमारास सापडला. यामुळे समुद्रजिवांना निर्माण झालेल्या धोक्याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मृत डॉल्फिन दिसताच उत्तन समुद्रकिनारी राहणाऱ्या कोळीबांधवांनी याची माहिती उत्तन सागरी पोलिसांना दिली. पोलिसांनी याबाबत वन विभागाला कळवले, त्यानंतर वनअधिकारी समुद्रकिनाऱ्यावर आले व त्यांनी डॉल्फिनचा पंचनामा करून त्याला समुद्रकिनाऱ्यावरच दफन केले.
दरम्यान, मृत डॉल्फिन 400 किलोच्या आसपास व 7 ते 8 फूट लांबीचा आहे. त्याच्या मृत्यूचे करण अद्याप पोलीस आणि वनविभागाला समजू शकले नाही. काही दिवसांपूर्वी भाईंदर पूर्वेच्या कोळी नगरच्या किनाऱ्यावर जिवंत डॉल्फिन माशाचे दर्शन झाले होते, परंतु काही काळानंतर हा डॉल्फिनसुद्धा मृत अवस्थेत किनाऱ्यावर वाहून आला होता.