परभणी- येथील जिल्हा रुग्णालयात काल रात्री उशिरा आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर काल संध्याकाळपर्यंत 6 नवे कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 405 एवढी झाली होती. मात्र, त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला, तर 183 रुग्ण बरे झाले, त्यामुळे आता उर्वरित 209 रुग्णांवर कोरोना रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
कोरोनाबाधित मृत व्यक्ती (वय 35) ही परभणी तालुक्यातील शहापूर येथील असून तिचा काल रात्री उशिरा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली आहे. त्यानुसार आता जिल्ह्यातील मृतांचा आकडा 13 झाला आहे. रुग्णास 12 जुलै रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोना चाचणीत त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 8 दिवस त्याच्यावर उपचार झाल्यानंतर काल रात्री त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. काल दिवसभरात 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर 8 जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. अजूनही 42 स्वॅबचा अहवाल प्रलंबित आहे. रुग्ण संख्या वाढत असली तरी उपचारासाठी दाखल असलेल्या एकूण रुग्णांपैकी 2 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये सेलू शहरातील मारोती नगरातील 30 वर्षीय पुरुष, पारिजात नगरातील 31 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान, काल आढळून आलेल्या 6 जणांमध्ये परभणी शहरातील जुना पेडगाव रोडवरील 39 वर्षीय, गंगाखेड शहरातील नवा मोंढा भागातील 22 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय पुरुष, देवळे जिनिंग परिसरातील 22 वर्षीय पुरुष, मानवत शहरातील रंगार गल्लीतील 9 वर्षीय मुलीचा समावेश आहे.
काल 10 स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. संशयितांचा आकडा आता 3 हजार 854 वर पोहोचला असून, आतापर्यंत 4 हजार 106 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. यापैकी 3 हजार 482 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, 42 जणांचा अहवाल प्रलंबित आहे. तर 125 अहवाल अनिर्णायक असून 52 स्वॅब तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा प्रयोग शाळेने दिला आहे.
'सारी' आजाराने पहाटे एका रुग्णाचा मृत्यू
आज पहाटे साडेपाच वाजता 'सारी' च्या आजाराने एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे, ही माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. दरम्यान, या रुग्णाला निमोनिया देखील झाला होता. मात्र या रुग्णाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यामुळे त्याच्यावर 'सारी' या आजाराच्या पार्श्वभूमीवर उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे त्याचे उपचारादरम्यान निधन झाले.