मुंबई - कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 प्रकल्पातील 32वा ब्रेक थ्रू नुकताच यशस्वी झाला आहे. या ब्रेक थ्रूमुळे आता एकूण भुयारीकरणाचे 87 टक्के काम पूर्ण झाले आहे. आता केवळ 9 ब्रेक थ्रू बाकी असून हा ब्रेक थ्रू यशस्वी झाल्यास 41 ब्रेक थ्रू पूर्ण होऊन भुयारीकरणाचे 100 टक्के काम पूर्ण होणार आहे. यामुळे लवकरच मेट्रो 3 प्रकल्प दृष्टीक्षेपात येईल, असे एमएमआरसी (मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन)ने सांगितले आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ 33.5 किमीच्या मेट्रो मार्गासाठी 54.5 किमी (येणारी-जाणारी मार्गिका मिळून) भुयारीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 17 टीबीएम (टनेल बोरिंग मशीन)द्वारे काम करण्यात येत आहे. या टीबीएमद्वारे एक-एक भुयारीकरणाचा टप्पा अर्थात ब्रेक थ्रू पूर्ण करून बाहेर येणार आहेत. त्यानुसार आतापर्यंत 32 ब्रेक थ्रू पूर्ण झाले आहेत. या 32व्या ब्रेक थ्रू मुळे 46 किमीचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे. आता केवळ 9 ब्रेक थ्रू बाकी राहिले आहेत. या प्रकल्पातील 2,5,7 पॅकेजमधील 32 ब्रेक थ्रू पूर्ण झाले असून 1,3,4 आणि 6 पॅकेजमधील 9 ब्रेक थ्रू बाकी आहेत.
त्याचप्रमाणे, 33वा ब्रेक थ्रू चर्चगेट ते हुतात्मा चौक (अपलाइन) हा 649 मीटरचा असून 34वा सिद्धिविनायक ते दादर (डाऊनलाइन) हा 1126 मीटरचा आहे. 35वा ब्रेक थ्रू सहार रोड ते सीएसएमआयए आंतरदेशीय (अपलाइन) हा 1516 मीटरचा, 36वा हुतात्मा चौक ते सीएसएमटी (अपलाइन) 551 मीटर, 37वा चर्चगेट ते सीएसएमटी (डाऊनलाइन) 1233 मीटर, 38 सायन्स म्युझियम ते महालक्ष्मी (अपलाइन) 1118 मीटर, 39वा सायन्स ते महालक्ष्मी (डाऊनलाइन) 1136 मीटर, 40वा महालक्ष्मी ते मुंबई सेंट्रल (अपलाइन) 837 मीटर आणि 41 वा महालक्ष्मी ते मुंबई सेंट्रल (डाउनलाइन) 830 मीटर अशा 9 ब्रेक थ्रूचे काम पूर्ण होणे बाकी आहेत.