भंडारा - जिल्ह्यात काल (शुक्रवारी) कोरोनाचे 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर आज (20 जून) 4 नव्या रुग्णाची भर पडली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 75 वर गेली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात 2 रुग्ण लाखनी येथील, एक तुमसर व एक रुग्ण पवनीमधील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 41 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 34 जण अजून उपचार घेत आहेत.
बिहारमधून आणि मुंबईवरून प्रत्येकी 2 जण जिल्ह्यात परतले होते त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 75 रुग्णांपैकी भंडारा तालुक्यतील 10, साकोली तालुक्यातील 20, लाखांदूर तालुक्यातील 14, तुमसर तालुक्यात 4, मोहाडी तालुक्यात 2, पवनी तालुक्यात 14 आणि लाखनी तालुक्यातील 11 लोकांचा समावेश आहे. ही सर्व संख्या मागील माहिन्याभरातील आहे.
आतापर्यंत 3 हजार 422 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी 75 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 3 हजार 232 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 115 नमुन्यांचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही.
आज 20 जून रोजी आयसोलेशन वार्डमध्ये 29 व्यक्ती भरती असून 425 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे 548 भरती आहेत. 2 हजार 394 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे, मुंबई व इतर राज्यातून 43 हजार 150 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 37 हजार 768 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 5 हजार 382 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये, अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.