गडचिरोली - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत दोन नव्या कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेले पाहिले 10 कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. परंतू सोमवारी पुन्हा 2 नवे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 38 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाचे 30 ऍक्टिव्ह रूग्ण आहेत.
सोमवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये एक चामोर्शी तालुक्यातील आहे. हा रूग्ण मुंबईवरून परतल्यानंतर संस्थात्मक अलगिकरणात होता. तर रविवारी आढळलेला रुग्ण सिरोंचा तालुक्यातील असून तो हृदयविकाराच्या उपचारासाठी हैदराबाद येथे गेला असता तिथे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. तर बरे होवून घरी परतलेल्या रुग्णांमध्ये एक चामोर्शी तालुक्यातील तर दुसरा कोरची तालुक्यातील आहे. बाहेर जिल्ह्यातून प्रवास करून आलेल्यांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
दरम्यान, जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रुडे यांच्या हस्ते त्यांना कोरोनामुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर रुग्ण रुग्णवाहिकेने स्वतः च्या घरी रवाना झाले. त्यांना आता या पुढील सात दिवस गृह विलगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. पुढील सात दिवस आरोग्य विभागाकडून त्यांच्या घरीच त्यांच्या लक्षणांबाबत निरीक्षणे नोंदवली जाणार आहेत.