परभणी - वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या 5 दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यातील शहरी भागात संचारबंदी लागू केली होती. मात्र परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याने त्यांनी एक दिवस आधीच ही संचारबंदी शिथिल केली. मात्र याच वेळी सेलू येथील रुग्ण संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सेलू शहर तसेच तीन किलोमीटर परिसरात आज मध्यरात्रीपासून पुढील 3 दिवस संचारबंदी लागू केली आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून अचानक कोरोनाबधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेेल्या 4 दिवसात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांमुळे जिल्हा प्रशासनात चिंता निर्माण झाली. त्याामुळे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी 6 दिवसांची संचारबंदी जाहीर केली होती, परंतु परभणी शहर आणि जिल्ह्यातील इतर शहरी भागांमध्ये गेल्या दोन दिवसात सुधारलेल्या परिस्थितीमुळे एक दिवस आधीच ही संचारबंदी शिथिल करण्यात आली. त्यानुसार आज परभणी जिल्ह्यातील संपूर्ण शहरी भागातील बाजारपेठा उघडण्यात आल्या. सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बाजारपेठांना वेळ देण्यात आला होता. त्यानुसार नागरिकांनी दिलेल्या वेळेत खरेदी करून आपापल्या घरी जाऊन बसणे पसंत केले.
दरम्यान, सेलू शहरात मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सेलू शहर आणि तालुक्यात आतापर्यंत 12 रुग्ण आढळले असून त्यातील 4 रुग्ण काल मंगळवारी एकाच दिवशी सेलू शहरात आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आज मध्यरात्रीपासून सेलू शहर आणि 3 किलोमीटर परिसरात संचारबंदीची घोषणा केली आहे. त्यानुसार आज मध्यरात्रीपासून ते शनिवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवेशिवाय कोणीही बाहेर पडू नये. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, या संचारबंदीत अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, औषधे आणि इतर काही सेवांना सूट देण्यात आली आहे. यात विविध शासकीय कार्यालय, सेवाभावी संस्था आणि आरोग्य संदर्भातील सेवांचा समावेश आहे. तसेच सर्व शासकीय कार्यालय व त्यांची वाहने, शासकीय व खासगी दवाखाने, वैद्यकीय दुकाने, वैद्यकीय कर्मचारी व आपातकालीन सेवा, शासकीय निवारागृह व अन्न वाटप करणारे एनजीओ व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाना घेतलेली वाहने व व्यक्ती, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक्स मिडिया यांचे संपादक, प्रतिनिधी, वितरक, पेट्रोलपंप व गॅस वितरक, कर्मचारी व वाहने, खत, कृषी, बी-बियाणे वाहतूक व गोदामे, दुकाने, कामगार, कापूस खरेदी केंद्र, राष्ट्रीय बँका केवळ रास्तभाव दुकानदारांकडून चलनाद्वारे रोकड भरणा, तसेच ग्रामीण भागातील बँकेसाठी रोकड घेवून जाणारी वाहने व दुध विक्रेत्यांना सकाळी 6 ते 9 या वेळात संचारबंदीच्या काळात मुभा देण्यात आली आहे.
'कडबी मंडई, शास्त्री नगर, रवळगाव 'कन्टेन्मेंट झोन'
दरम्यान, कोरोनाबाधित आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सेलू शहरातील शास्त्री नगर आणि तालुक्यातील रवळगाव हा परिसर जिल्हाधिकाऱ्यांनी कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. या भागात निर्जंतुकीकरण आणि हा परिसर वाहतुकीसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे. परिसरात पोलिसांकडून सील लावण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच शहरातील कडबी मंडई या गजबजलेल्या परिसरात देखील कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने मनपा आणि पोलिसांना परिसर सील करण्यासोबतच परिसरात निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.