पालघर- वसई विरारमधील करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिकेने मोठे प्रतिबंधित क्षेत्रे बनविण्याचे प्रयोग गेल्या दीड महिन्यापासून हाती घेतले होते. या प्रयोगाला यश मिळत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. यासाठी पालिकेने वसई विरारमध्ये 29 नव्याने मोठे प्रतिबंधित क्षेत्रे तयार केली आहेत.
वसई विरार शहरात करोना रुग्ण वाढीचा वाढता आलेख पाहता प्रशासनापुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते. कोरोनाचे प्रादुर्भाव आणखी वाढू नये, त्यावर आळा घालता यावे यासाठी महापालिकेतर्फे मागील महिन्यापासून एक प्रयोग राबविण्यात आला. रुग्ण आढळून आलेल्या प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र प्रतिबंधित क्षेत्र न करता रुग्ण संख्या जास्त असलेले क्षेत्र एकत्र करून मोठे प्रतिबंधित क्षेत्र तयार करायचे पालिकेने ठरविले. म्हणजेच संपूर्ण क्षेत्र लॉकडाऊन करून या क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व सेवा, व्यवसाय करण्यास आणि नागरिकांना ये जा करण्यास तसेच एकत्र येण्यास मनाई करण्यात आली.
तसेच 14 दिवस संबंधित क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. त्यानुसार निर्णय घेत सुरवातीला प्रभाग समिती बी, सी, डी , एफ आणि जी मिळून एकूण 14 मोठे प्रतिबंधित क्षेत्रे तयार करण्यात आले. या ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर नायगाव कोळीवाडा आणि जूचंद्र येथे देखील लॉकडाऊन करण्यात आले.
या ठिकाणी 14 दिवस लॉकडाऊन केल्यानंतर पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची नजर या क्षेत्रांवर होती. लक्षणे असलेल्या नागरिकांची तपासणी करून नागरिकांना घराबाहेर पडू नये यासाठी कडक प्रतिबंध घातले. प्रतिबंध घातल्यानंतर या भागातील करोनाबाधित रुग्णांचा वेग मंदावल्याचा दावा पालिका आयुक्त गंगाथरन डी यांनी केला आहे. यासाठी पालिकेने या मोठ्या प्रतिबंधित क्षेत्रात वाढ केली आहे.
तसेच नुकतेच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत देखील वसई विरार संपूर्ण लॉकडाऊन न करण्याचा निर्णय घेत प्रतिबंधित क्षेत्राचा प्रयोग पुढे देखील असाच सुरू ठेवण्याचे सर्वांनी सुचविले होते. याच पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिका आयुक्तांनी ज्या भागात जास्त रुग्णसंख्या आहे, त्या भागांची माहिती मागवत तेथे मोठे प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वसई विरार महापालिका क्षेत्रात प्रभाग समिती सी मध्ये 3 , प्रभाग ई मध्ये 4 , प्रभाग एफ मध्ये 2, प्रभाग समिती बी मध्ये 3 , प्रभाग डी मध्ये 14 आणि प्रभाग समिती आय मध्ये 3 असे मिळून एकूण 29 नव्याने मोठ्या प्रतिबंधित क्षेत्राची वाढ झाली आहे. या भागात आज पासून 14 दिवस लॉकडाऊन असणार आहे.
दरम्यान, वसई विरारमध्ये बनविण्यात आलेल्या मोठ्या प्रतिबंधित क्षेत्रात रुग्णांचा आलेख कमी होताना दिसून आला आहे. यासाठी आम्ही हा मोठे प्रतिबंधित क्षेत्रे बनविण्याचा प्रयोग पुढे सुरू ठेवला असून अधिक नव्याने क्षेत्रे त्यामध्ये समाविष्ट केले असल्याचे वसई विरार महापालिका आयुक्त गंगाथरन डी यांनी सांगितले.