सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील रस्त्यांवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. एकूण ४ कोटी ९८ लक्ष रुपये खर्चून जिल्ह्यातील ९३ ठिकाणी २८० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी याबाबत माहिती दिली.
संपूर्ण जिल्ह्यात लावण्यात आलेल्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आता जिल्हा अधिक सुरक्षित झाला आहे. यामुळे पर्यटन व्यवसाय वाढीसाठी मदत होणार आहे. जिल्ह्यातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होणार आहे. महिला व बालकांवरील अत्याचारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. रीमोट अनौन्सिंगमुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये मनुष्य हानी टाळता येणार आहे. महामार्ग व शहरातील रस्त्यांवरील वाहनांना शिस्त लागेल, हरवलेल्या वस्तू व व्यक्ती यांचा मागोवा घेणे सोपे होणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या प्रकल्पाविषयी माहिती देताना सांगितले.
या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ९३ ठिकाणी २८० कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, साटेली-भेडशी, बांदा, देवगड-जामसंडे, वैभववाडी, मालवण अशा शहरातील एकूण ५९ ठिकाणी कॅमेरे आहेत. तर म्हापण, परुळे, पाट, आंबोली, मळगाव, वेताळ बांबर्डे, पणदूर, कसाल, आचरा, कुणकेश्वर, शिरगाव, नांदगाव, भूईबाडवा, पडेल या १८ ठिकाणीही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील ६ रेल्वे स्टेशन, ३ जेटी, ७ तपासणी नाके ही आता सीसीटीव्हीच्या नजरेत आले आहेत.
बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांपैकी २१० कॅमेरे हे ४ मेगापिक्सेल नाईटव्हीजन बुलेट प्रकारातील आहेत. तर ३० कॅमेरे हे ४ मेगापिक्सल रंगीत नाईटव्हीजन बुलेट कॅमेरे प्रकारातील आहेत. तर स्वयंचलित वाहन क्रमांक ओळखणारे नाईटव्हीजन कॅमेरे ४० आहेत. या संपूर्ण प्रकल्पाची साठवण क्षमता सहाशे टेराबाईट्स असून ४५ दिवसांपर्यंत साठवण करता येते.
जिल्हा नियंत्रण कक्ष तसेच पोलीस ठाणे पातळीवर लाईव्ह कॅमेऱ्याद्वारे देखरेख व प्लेबॅकची सुविधा, प्रत्येक कॅमेऱ्यामध्ये अंतर्गत संचय सुविधा तसेच पॉवर बॅकअप आहेत. जिल्हा नियंत्रण कक्ष येथे २२ फूट रुंद हाय डेफिनेशन व्हिडिओ वॉल आणि व्हिडिओ व्यवस्थापन सर्व्हर, स्टोरेज सुविधेसह सुसज्ज आहेत. सर्व सीसीटीव्ही हे सौर ऊर्जेवर चालणारे आहेत. तसेच सर्व यंत्रणा ही हायस्पीड फायबर ऑप्टिक्स नेटवर्कने जोडलेली आहेत. ४ मेगापिक्सल कॅमेरे असल्यामुळे रस्त्यावरील सर्व हालचालींचे स्पष्ट चित्रण करणे शक्य होणार आहे.